ॐ कपड्यांवर नको  !

0
11

हल्ली    नम: शिवाय ।  हा मंत्रजप लिहिलेले सदरे, शर्ट्स तयार कपड्यांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले पाहायला मिळतात. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्याच्या दरम्यान ऑनलाईन संकेतस्थळांवरसुद्धा अशा कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. बारा ज्योतिर्लिंग तसेच भगवान शिवाची पुरातन मंदिरे ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या स्वरूपाच्या कपड्यांचे स्टॉल्स पाहायला मिळतात. महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणी भरणाऱ्या जत्रांमध्ये सुद्धा  ‘ॐ नम: शिवाय ।’ मंत्रजप प्रिंट केलेले कपडे विक्रीसाठी ठेवलेले दिसून येतात, ज्यांना तरुणवर्गाकडून अधिक पसंती दिली जाते. अंगभर  ॐ नम: शिवाय ।  हा मंत्रजप लिहिलेले सदरे परिधान करण्याची आता जणू फॅशनच येत चालली आहे. जीन्स पॅन्टवर अशा प्रकारचे सदरे घातलेले तरुण हल्ली सर्वत्र पाहायला मिळतात.  ‘ॐ नम: शिवाय ।’  हा भगवान शिवाचा मंत्रजप असून याच्या नियमित स्मरणाने शिव प्रसन्न होऊन आपली मनोकामना पूर्ण करतो असे म्हटले जाते. यामध्ये ओम हा बीजमंत्र असल्याने या मंत्रात शक्तीही तेव्हढ्या प्रमाणात सामावलेली असते. त्यामुळे तो श्रद्धेने स्मरावा असे धर्मशास्त्र सांगते. धर्मशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवतेचे नाम अथवा प्रतिमा असते त्या ठिकाणी त्या देवतेचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्या देवतेची शक्ती कार्यरत असते.   

 

ॐ नम: शिवाय l सारख्या या शक्तिशाली मंत्राचा हल्ली कपड्यांवर होत असलेला सुमार वापर मनाला खटकणारा आहे. मंत्रजप छापलेले कपडे घालून आपण आवश्यक ती शुचिर्भूतता पाळतो का ? अशा प्रकारचे कपडे परिधान करून आपण कोणत्याही अपवित्र स्थळी जात असू, मद्यपान, धूम्रपान करत असू, मुक्तपणे वावरत असू तर तो प्रत्यक्ष शिवाचाच अवमान आहे. अंगाला येणाऱ्या घामामुळे घातलेल्या कपड्यांना दुर्गंध येऊ लागतो. असे कपडे अन्य कपड्यांसोबत धुतांनाही आपण विशेष काळजी घेत नाही.  एकीकडे आपली शिववभक्ती दाखवण्यासाठी अशा प्रकारचे कपडे घालायचे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष शिवाचाच अवमान करायचा अशाने शिवाची कृपा आपल्यावर होईल का ? भक्ती ही मनापासून करावी, त्यासाठी हिंदू धर्मात अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. अशा प्रकारे मंत्रजपाचे कपडे परिधान करून आपल्या भक्तीचा देखावा करू नये. अशा प्रकारचे कपडे तयार करून ते विक्रीसाठी ठेऊन व्यापारी वर्ग आपला व्यवसाय वाढवू पाहतात आणि आपल्यासारखे भगवान शिवाचे भक्त हे कपडे चढ्या दरात विकत घेतात. त्यामुळे भगवान शिवाचा मंत्रजप छापलेले कपडे विकत घेणे आणि ते परिधान टाळायला हवे. त्याऐवजी ॐ नमः शिवाय हा मंत्रजप श्रावणात अधिकाधिक करायला हवा. ज्यामुळे भगवान शिवांची अखंड कृपा आपल्यावर राहिल.

 

जगन घाणेकरघाटकोपरमुंबई 

संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here