सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सांगली जिल्हयामध्ये आजअखेर ग्रामीण क्षेत्रामधून 12537 अर्ज तर महानगरपालिका क्षेत्रातून 2193 अर्ज असे एकूण 14730 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज विनामुल्य असल्याने संबंधित ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय, सांगली यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच सदर अर्जासोबत विहीत स्वघोषणापत्रे, आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असलेबाबतचे वैदयकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा इ. कागदपत्रे जोडुन परिपुर्ण अर्ज त्यांचेकडेच सादर करावेत तसेच या योजनेचा सांगली जिल्हयातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून करण्यात आले आहे.