इस्लामपूर : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी मंडल अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांसाठी म्हणून ७ हजारांची लाच मागणाऱ्या येडेमच्छिंद्र येथील महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले आहेत.याप्रकरणी दोघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी सीमा विलास मंडले (वय ४४, रा. सैदापूर, ता. कराड), चंद्रकांत बबनराव सूयर्वंशी (वय ३३, रा. येडेमच्छिंद्र) अशी लाच मागणाऱ्या दोघांची नावे आहेत.
अधिक माहिती अशीकी,तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीवर त्याच्या नावाची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी येडेमच्छिंद्र येथील तलाठी कायार्लयात अर्ज केला होता.त्यावेळी नाव नोंदणी करण्यासाठी तलाठी मंडले आणि सूर्यवंशी यांनी त्यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी केली.
त्याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.लाचलुचपतच्या पडताळणीत तलाठी मंडले आणि सूर्यवंशी यांनी याबाबत मंडल अधिकारी श्रीमती जाधव यांच्याशी व्हाट्सएपवर कॉल करून चर्चा करत मंडल अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यासाठी सात हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली