सांगली : राज्यात सर्व जिल्ह्यांना’मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांत ‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्वीडन व पाकिस्तान या देशांनी ‘मंकीपॉक्स’ बाधित रुग्ण नोंदवले आहेत. परिणामी मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाचे तीव्रता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने या आजाराचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंकीपॉक्स’ची लक्षणे काय?
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कानातील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे, खोकला, शरीरावर अचानक पुरळ ही लक्षणे आहेत.
सांगलीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या नियोजनाखाली उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाय केले जात आहेत. जिल्ह्यात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
तथापि, काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. वाघ यांनी सांगितले. हा आजार ऑर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत. जिल्ह्यात या रोगाचा सध्या एकही रुग्ण नाही.