अजित पवारांचं होम पीचवर शक्तिप्रदर्शन, संपूर्ण बारामती न्हालं गुलाबी रंगात

0
3

‘बारामती विधानसभा मतदारसंघात इतर २८७ मतदारसंघांपेक्षा जास्त काम झालं आहे’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरू असलेली ‘जन सन्मान यात्रा’ आज (सोमवार- ०२.०९.२०२४) पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होत्या. या वेळी भव्य बाईक रॅली काढत कार्यकर्ते आणि समर्थकांनी जन सन्मान यात्रेचं बारामतीत जोरदार स्वागत केलं. बारामती विधानसभा मतदारसंघात इतर २८७ मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधीक विकासकामं पूर्ण केल्याचा दावा अजित पवार यांनी या आज केला आहे.
बारामती येथील टीसी कॉलेज मैदानावर पार पडलेल्या सभेला संबोधीत करण्याआधी अजित पवारांनी जनसन्मान यात्रेत सहभागी सर्व महिला, शेतकरी, कामगार आणि सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींचे आभार मानले. बारामतीकरांचे आभार मानताना अजित पवार म्हणाले की, “गेली ३५ वर्षे तुम्ही सगळ्यांनी मला लोकप्रतिनिधी या नात्यानं स्वीकारलं आहे. खासदार, आमदार, मंत्री केलं. एवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत तर राज्याचा विरोधी पक्ष नेता आणि आता उपमुख्यमंत्रीही केलं आहे.

 

तुमच्या पाठिंबाच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आहे.” बारामतीच्या सर्वांगीण विकासाला चालना देता येईल याबद्दलचाच प्रयत्न आपण नेहमीच करत आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
जन सन्मान यात्रेची सुरुवात करत असताना, कोणावर टीका करायची नाही. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. गोरगरीब जनतेला आधार मिळावा यासाठी प्रयत्न करायचे व त्यांच्यासाठी असलेल्या योजना, केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवायची, असं आपण मनाशी पक्क ठरवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बारामती तालुक्यातील जिरायत आणि इतर भागासाठी काय करता येईल, याचा विचार आपण कायम करत आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

हे सांगताना जनाई-शिरसाई नदी कालवा, पुरंदर उपसा सिंचनसाठी काय केलं गेलं पाहिजे, यावर भाष्य केलं. निरा कालवा उपसा सिंचन योजनेद्वारे तालुक्यातील राहिलेला काही भाग कसा बागायत करता येईल याबाबत आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
जन सन्मान यात्रेला सुरूवात झाल्यानंतर महिला, तरूण आणि सर्व बारामतीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “कार्यक्रमात हजारो महिलांनी मला राख्या बांधल्या. भावाच्या नात्याने भेटण्याचा प्रयत्न करत होत्या, हे सर्व बघून मी अचंबित झालो.”

 


मी जातीचं, नात्यांचं राजकारण करण्याचा कधीच विचार केला नाही. समाजातील जास्तीत जास्त घटकांचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे, हे सांगताना अजित पवार म्हणाले, “सगळं गुलाबी वातावरण झालंय. बरेचजण याबद्दल विचारत असतात की, हा रंग तुम्हाला का आवडायला लागला? मी म्हटलं, या गुलाबी फेट्यामध्ये माझ्या बहिणी गोंडस आणि राजबिंड्या दिसतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.”

महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांना लाभ झाला आहे. या कार्यक्रमात हजारो महिलांनी पवारांना राख्या बांधल्या. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “मी सहज माहिती घेतली की यंदाच्या रक्षाबंधनाला किती राख्या विकल्या गेल्या. तर, अशी माहिती मिळाली की आजपर्यंत एवढ्या राख्या कधीच विकल्या गेल्या नाहीत जेवढ्या यावर्षी विकल्या गेल्या, एवढा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रत आहे”

अजित पवारांनी यानंतर फलटणमधील कोळकी येथे महिलांसोबतच्या मेळाव्याला तर शुक्रवार पेठ येथे कामगारांच्या मेळाव्याला संबोधीत केलं. मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण, वर्षाला ५२ लाख कुटुंबांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात, ४४ लाख शेतकऱ्यांना विज सवलत, दुधाला ५ रुपये अनुदान, युवा कार्य प्रशिक्षण योजना यांबद्दल माहिती दिली. तसेच, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या शेजारी कॅन्सर हॉस्पिटल बांधणार असून तेथे मोफत उपचार मिळतील आणि लवकरच हे हॉस्पिटल आपल्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here