लातूर : अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यात चालकपदावर असलेल्या लातूर येथील एका सैनिकाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह अरुणाचल प्रदेशच्या ब्रह्मपुत्रा नदीत उडी घेतल्याची घटना समोर आली. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी त्या माय-लेकरांचा शोध लागलेला नाही. विवाहितेच्या वडिलांनी अरुणाचल पोलिसांत पतीविरोधात गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जावयाविरोधातच घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
लातूर येथील नागनाथ नामदेव उदगीरे हा रिक्षाचालक होता. मागील ४ वर्षांपूर्वी सैन्यातील चालकपदासाठी त्याची नियुक्ती झाली. मागील १० महिन्यांपूर्वी त्याची बदली अरुणाचल प्रदेशात झाली. २०१५ मध्ये नागनाथ हा लातूर शहरात रिक्षाचालक होता.
त्याचा पूनम रामजीवन लोखंडे या तरुणीशी २०१५ मध्ये प्रेमविवाह झाला. दरम्यान, त्यांना दोन मुले झाली. अर्णव नागनाथ उदगीरे (८) व आरव नागनाथ उदगीरे (७) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूनम नागनाथ उदगीरे ही विवाहिता अर्णव व आरव या दोघांना घेऊन अरुणाचल प्रदेश येथील घरून बाहेर पडली. दिवसभर ती मुलांसह ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेल्या उद्यानात बसली होती. तेथून आई, बहिणींना फोन करून पती देत असलेल्या त्रासाची माहिती देत होती. त्याचवेळी पती नागनाथ उदगीरे याने लातूर येथील सासरच्या मंडळींना फोन करून पूनम घरातून गेल्याचे सांगितले. मागील तीन दिवसांपासून पती-पत्नींमध्ये वाद झाल्याचे पूनम आई-वडिलांना सांगत होती.
पूनम यांना लातूर येथील नातेवाईक घरी जाण्याची विनवणी करीत होते. परंतु तिने कोणाचेही ऐकले नाही. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पूनम हिने ब्रह्मपुत्रा नदीच्या कडेला दोन्ही बाळांना उभे केले. त्यांचा फोटो काढून ‘सॉरी बाळांनो, मला माफ करा’ असे स्टेटस मोबाईलवर ठेवले. त्यानंतर पूनमने फोन घेतला नाही. पूनमच्या लातूर येथील बहिणीने तिचा पती नागनाथ उदगीरे याला ही घटना सांगितली. तो नदीकाठी गेला. त्यानेच पूनमचा फोन उचलला. पूनमने दोन मुलांसह नदीपात्रात उडी घेतल्याचे त्याच्या मित्राने पाहिल्याचे त्याने सांगितले. ही घटना समजताच तत्काळ पोलिसांनी नदीपात्रात शोध सुरू केला. मागील पाच दिवसांपासून शोध घेण्यात येत असला तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत तिघांचाही तपास लागला नव्हता.
बुर्ज खलिफापेक्षा उंच पर्वत
कॅलिफोर्निया: अमेरिकन महासागर शास्त्रज्ञांनी चिलीच्या किनाऱ्यापासून सुमारे दीड हजार किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात एका मोठ्या पर्वतराजीचा शोध लावला असून त्याचा एक भाग तीन हजार १०९ मीटर उंच आहे. विशेष म्हणजे या सागरी पर्वताची उंची ग्रीसच्या २ हजार ९१७ मीटर उंचीच्या माऊंट ऑलिम्पसपेक्षाही अधिक असून जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा चार पट उंच असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. एका अहवालानुसार, श्मिट ओशन इन्स्टिट्यूट (एसओआय) ने या पर्वतराजीचा शोध लावला असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या टीमने आर/ व्ही फाल्कन या जहाजाच्या मदतीने २८ दिवस समुद्रात अभ्यास केला.
जहाजावर स्थापित सोनार प्रणाली वापरून या सीमाऊंटची उंची मोजण्यात आली असून हा पर्वत सुमारे ७० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. संस्थेच्या कार्यकारी संचालिका ज्योतिका विरमानी म्हणाल्या, ध्वनी लहरी खाली जातात आणि पृष्ठभागावरून परत उसळतात. त्यावेळी घेतलेल्या वेळेनुसार पर्वताची उंची मोजली गेली. यातून समुद्रतळाच्या स्थलाकृतीबद्दल बरेच काही शिकायला मिळाले.
महासागर शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, जगभरात एक हजार मीटर म्हणजेच तीन हजार २८० फूटपेक्षा कमीत कमी दहा लाख सीमाऊंट्स आहेत. ते विविध प्रकारच्या प्रजातींचे घर आहेत. पाण्याखालील रोबोटच्या साहाय्याने नव्याने सापडलेल्या पर्वतराजीचे स्कॅनिंग केले असता, टीमला सागरी प्राण्यांनी भरलेले जग सापडले. एक पांढरा कॅस्पर ऑक्टोपस देखील दिसला, जो यापूर्वी दिसला नव्हता.