पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून करणाऱ्या पतीचा पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. ही घटना नदीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती शिरोली पोलीस ठाण्यात दिली.
शिरोली पुलाची येथील कोरगावकर कॉलनीत भाड्याच्या घरात सागर कोळवणकर व मनीषा कोळवणकर हे मुलांसह राहत होते. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सागरने झोपेत असणाऱ्या पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडा मारून गंभीररीत्या जखमी केले होते. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी रात्री तिचे निधन झाले. त्यानंतर शिरोली पोलीस ठाण्यात सागरवर खुनाचा दाखल केला होता.
दरम्यान, सोमवारी रात्री मनीषाला रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा सागरने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक न करता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले. पण तो पहाटेच्या सुमारास रुग्णालयातून पसार झाला होता. बावडा मार्गे शिये पंचगंगा नदीच्या पुलावर आला, त्याने नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पहिल्याचे समजते. पण त्याचा शोध घेतला असता तो सापडला नव्हता. त्यामुळे सागरने आत्महत्या केली असावी, असाही संशय व्यक्त होत होता.
गुरुवारी शिरोली येथील काही नागरिक वर्षाचा गणपती विसर्जनासाठी नदीकडे गेले होते. तेव्हा त्यांना पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगत असताना दिसला. त्याबाबत त्यांनी शिरोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली. हा मृतदेह सागरचा असल्याची खात्री करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मानसिक संतुलन बिघडल्याने सागरने पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून केला. त्यानंतर त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.