लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता तसंच आता विधानसभा निवडणुकीसाठीही घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले. तसेच संजय पाटील यांना घरी बसवू असा इशारा त्यांनी दिला.तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विशाल पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. तसा विधानसभा निवडणुकीलाही अजितराव घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही. संजय पाटील यांना आता कायमचे गाडायचे असून हा राक्षस पुन्हा वर येऊ द्यायचे नाही. या रावणाची लंका जाळायची जबाबदारी लोकसभेला अजितराव घोरपडे यांनी घेतली होती. त्यांनी शब्द देऊन जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील असून या प्रेमाचा परतावा वसंतदादा घराण्याला कसा करायचा ते कळतो.
ते म्हणाले, माजी खासदार संजय पाटील दहा वर्षात जेवढे बोलले तेवढे मी एका शपथविधीला बोललो. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सगळे देव पाण्यात घातले. पण, एकही देव त्यांना पावला नाही.अजितराव घोरपडे म्हणाले, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने खासदार बदलले. ही मोहीम यशस्वी झाली. संसदेतील भाषण बघून माझी निवड किती योग्य होते हे लोकांच्या लक्षात आले. पण ही संधी यायला दहा वर्षे वाया गेली. आमचाच खासदार व आमचाच आमदार या गोष्टीने मतदारसंघाचे वाटोळं झालं, असे सांगत जिल्ह्यात एक वेगळी संघटना उभी करणार असून ‘विशाल पर्व’ सुरू करूया,असे त्यांनी सांगितले.
युवक नेते स्वप्नील पाटील म्हणाले, या शेतकरी मेळाव्यासाठी खासदार येणार का, यावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. द्राक्ष पट्ट्यात द्राक्षाला भाव नाही. शेतीच्या अन्य प्रश्नांनी शेतकरी भिकेला लागायची वेळ आली आहे. मात्र येथील आमदार, माजी खासदार कधी त्यावर बोलले नाहीत. अनुकंपासारख्या आमदारकींच्या खिरापती वाटण्याचे काम सुरू आहे. स्व. आर. आर. पाटील हेच घराणेशाहीचे खरे विरोधक होते. अजितराव घोरपडे यांनी उभं राहावं. तासगावची खिंड आम्ही लढवू.
डॉ. प्रताप पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडले गेले नाहीत. ते प्रश्न एका अधिवेशनात आम्ही विशाल पाटील यांच्याकडून ऐकले. परिवर्तन करून मतदारसंघाचा विकास करूया. सेटलमेंटचे राजकारण आता थांबवूया.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, आमदारकी आता कोंगनोळीला नेऊया. चिंचणी व अंजनीने या मतदारसंघाला गंडवले आहे. आर. आर. पाटील गटाने गंडवले तर संजय पाटील गटाने लुबाडले, असे सांगत तालुका या दोन्ही घराण्यातून मुक्त करा असे आवाहन केले.
पांडुरंग पाटील म्हणाले, विशाल पाटील यांच्या निवडणुकीत कुरघोड्या करणारा राष्ट्रवादीचा तो नेता अविश्वासू आहे. लोकसभेला त्यांना बेधडक मदत अजितराव घोरपडे यांनी केली आहे. आता खासदारांनी येत्या विधानसभेला मदत करावी. संजय पाटील धोका देऊन शिकार करतात. सुरेश पाटील ताणून मारण्याची भाषा करतात. मात्र, त्यांना उठवून बसवायला दोन माणसे लागतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभेला कुरघोड्याचे राजकारण केल्यामुळे विशाल पाटील यांना कमी मताधिक्य मिळाले असल्याचे सांगत वडील ग्लुकोज फॅक्टरी सुरु शकले नाहीत आणि पोरगा एमआयडीसीचे गाजर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखवत आहे.
यावेळी किशोर उनउने, दिलीप पाटील, पी. डी. पाटील, जोतीराम जाधव, साहेबराव पाटील, अरुण खरमाटे, अमित पाटील, महादेव पाटील, आर. डी. पाटील, पै. निवास पाटील, विक्रमसिंह पाटील, अर्जुन थोरात, अनिल पाटील उपस्थित होते. इंद्रनील पाटील यांनी स्वागत केले.
बैठक राष्ट्रवादीची, चर्चा काँग्रेस अध्यक्षाची : महादेव पाटील
तासगाव बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गेली दोन वर्षे सातत्याने त्या भानगडी आम्ही बाहेर काढत आहे. लोकसभेलाही तुम्ही गद्दारी केली आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष बदलायची चर्चा करता. आमचा पक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील म्हणाले.