जत : जतच्या म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन प्रकल्पाचा मुख्य शीर्ष कामात सुरुवात झालेली असून त्याचा पुढील कालवा कामाची सुमारे ९८० कोटीचे निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेस 6TMC पाणी मंजूर केले होते. सदर योजनेला महायुती शासनाने सुमारे १९८० कोटी मंजूर केले आहेत. म्हैसाळ विस्तारित योजनेमुळे जत तालुक्याचा उर्वरित ६५ गावांना जीवनदान मिळणार आहे.या प्रकल्पाच्या कालव्याच्या रेषेमध्ये कोळे गिरी गुड्डा पूर येथील वन जमिनीचा अडथळा होता.
या प्रकल्पासाठी वन विभागाकडून मंजुरी घेणे आवश्यक होते. सदरचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून केंद्रीय वन मंत्रालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडे पाठवले होते. सदर प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी अमोल डफळे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या पत्राने माननीय चंदुलाल तासीलदार सहाय्यक वन महानिरीक्षक नागपूर यांनी प्रधान सचिव वने महाराष्ट्र शासन यांना काही अटी व शर्ती अनन्वये या योजनेच्या कोळीगीरी गुड्डापूर ग्रॅव्हिटी मेन बाबत मंजुरी देत असल्याबाबत कळवले आहे.
त्यामुळे जत तालुक्याच्या दुष्काळमुक्तीच्या या योजनेत गती मिळणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देणे सुलभ झाले आहे. याबद्दल अमोल डफळे यांनी दूरध्वनीद्वारे श्री तासीलदार यांचे आभार मानले.