सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कार्यालयातर्फे जिल्ह्यात तीन हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनंत चतुर्दशीपर्यंत बंदोबस्तात तैनात केले आहेत. ध्वनी मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळाविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे मंडळांना आचारसंहितेचे उल्लंघन न करता उत्सव साजरा करावा लागणार आहे. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ७ पोलीस उपअधिक्षक, २१ पोलीस निरीक्षक, १३० सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ७०० पोलीस कर्मचारी, ९०० होमगार्ड, एसआरपीएफच्या १ कंपनीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवावर लक्ष असणार आहे.
बंदोबस्ताकरीता १५ शिकावू पोलीस उपनिरीक्षक परजिल्ह्यातून सांगलीत दाखल झाले आहेत. गणेशोत्सव कालावधीत ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येणार आहे. मागील वर्षी सुमारे सत्तरहून अधिक मंडळांवर ध्वनीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला होता. यंदाही आवाजावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मजकूर शेअर न करण्याचे आवाहन केले असून सायबरचे त्यावर लक्ष राहणार आहे. महापालिका क्षेत्रात ६ पोलीस निरीक्षक, ४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५५० पोलीस कर्मचारी ते ३५० होमगार्ड तैनात केले आहेत.
अनंतचतुर्दशीदिवशी मिरजेतील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. जिल्ह्यात दि. ७ ते १७ या कालावधीत गणेशोत्सवाचा उत्साह आहे. दि. १६ रोजी ईद आहे. दोन्ही सणांच्या अनुषंगाने जिल्ह्यातून मिरवणुका, विविध आंदोलने करावयाची असतील तर पोलीस परवानगी काढणे बंधनकाम केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरिता पोलीस ठाणे निहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीबाबत निर्देश देणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, वाद्ये कोठे वाजवावीत याचे नियोजन करणे, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घेणे आदींचा यामध्ये समावेश आहे.