जेवण करतानाही मोबाइलवर चॅटिंग करत असलेल्या मुलीला वडिलांनी हटकल्याने ती घरातून रफूचक्कर झाली. ५ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास रामपुरी कॅम्प भागात ही घटना घडली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अपहृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून संशयित म्हणून साम्या सुलताने या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार,फिर्यादी हे ५ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास ड्युटीवरून घरी परतले. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगीदेखील घरीच होती. ते जेवण करत असताना मुलीने नेहमीप्रमाणे त्यांचा मोबाइल घेतला व ती तिच्या रूममध्ये बसली. जेवण झाल्यावर पित्याने तिच्या रूममध्ये जाऊन पाहिले असता, ती जेवण करताना मोबाइलवर चॅटिंग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे तू कोणासोबत मोबाइल चॅटिंग करत आहेस, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मी एक महिन्यापासून साम्या नावाच्या मुलासोबत चॅटिंग करत असल्याचे ती म्हणाली. त्यामुळे तिच्या वडिलांना राग आल्याने त्यांनी आपला मोबाइल स्वतःकडे घेतला.
चॅटिंग तपासत असताना पडली ती घराबाहेर
वडिलांनी मोबाइल घेतल्याने ती जेवणाचे ताट घेऊन किचनमध्ये गेली. दरम्यान, वडील ते चॅटिंग तपासत असताना त्यांनी पत्नीला उद्देशून मुलगी नेमकी काय करत आहे, तिला विचारायला हवे, असे म्हणत पती-पत्नीने मुलीकडे मोर्चा वळवला. मात्र, ती दिसून आली नाही. तिला आवाज दिला असता तर ती घरात दिसली नाही. त्यामुळे आपली नजर चुकवून ती घराबाहेर पडल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले. तिच्या मित्र- मैत्रिणींसह नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला.