सांगली : शासकीय अनुदान, नवीन योजनेचा लाभ आणि बँकांमध्ये करावी लागणारी खात्यासाठीची केवायसी यासाठी आधार कार्ड हे अपडेट असणे आवश्यक आहे. याच आधार कार्डला अपडेट करण्यासाठी सध्या नागरिकांची पळापळ सुरू आहे. जामखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या सुविधा केंद्रांची संख्या अपुरी पडत असल्याचे सध्या दिसून येत आहे. यातच अनेक वेळेला कुठे सर्व्हरचा, तर कुठे मनुष्यबळाचा अभाव असल्याने कामे रखडतात.
तर काही सुविधा केंद्र बंद पडली आहेत.आधार त्यावरील फोटो, जन्मतारीख, रहिवास पत्ता यासह विविध बाबी सर्व ठिकाणी बहुपयोगी पडतात. मात्र, अनेकांचे आधार कार्ड हे दहा वर्षांपूर्वीचे किंवा त्याही आधी काढलेले आहे. आता किमान दहा वर्षांतून एकदा ते अपडेट करणे गरजेचे बनले आहे. नावात, आडनावात झालेल्या चुका दुरुस्त करून ते तंतोतंत इतर कागदपत्रावरील नावाप्रमाणे सादर करणे गरजेचे ठरत आहे. परिणामी, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेकांची धावाधाव सुरू झाली आहे. सामान्यांची पळापळ थांबण्यासाठी प्रशासनाच्या आधाराची, पाठबळाची आवश्यकता आहे.