तुमच्या आधारकार्डवरून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले असून मनी लॉड्रींग झाल्याचा आरोप करीत भामट्यांनी शहरात भाडेतत्वाने राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धास सुमारे ७ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणाविषयी तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत ७ कोटींपैकी ३ कोटी रुपयांचे व्यवहार गोठवले आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित सायबर भामट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार परिसरात ८० वर्षीय वृद्ध मुलासह राहतात. संबंधित वृद्धाने खार येथील स्थावर मालमत्ता विक्री करून त्यातून आलेले पैसे विविध बँक खात्यांमध्ये ठेवले असून ते नाशिकला भाडेतत्वाने राहत आहेत. याचदरम्यान, दि. २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सायबर भामट्यांनी वृद्ध व्यक्तीसोबत संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच वृद्धाचे आधारकार्ड नंबर सांगत या आधारकार्डसह वेगवेगळ्या बँक खात्यांतून तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्यामुळे सीआयडी, सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय तुमच्यावर कारवाई करणार आहेत.
तुम्हाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सांगत, इडी, सीबीआयचा बनावट सही शिक्का, लोगो असलेले कागदपत्रे, अटक वॉरंट वृद्धास पाठवले. त्यामुळे वृद्ध घाबरल्याने त्यांनी कारवाईच्या भितीपोटी भामटे सांगतील तसे करण्याची तयारी दर्शविली. त्याचा फायदा घेत भामट्यांनी संबधित वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून ६ कोटी ९० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात घेतले. मात्र वृद्धाने वेळीच याची माहिती सायबर पोलिसांना दिल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आर्थिक व्यवहारांचा माग काढत, त्यापैकी ३ कोटी रुपयांचे व्यवहार थांबवले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर हे पैसे वृद्धास परत मिळतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
वृद्ध व्यक्तीच्या नावे बैंक खाती
भामट्यांनी वृद्ध व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करीत चार ते पाच बँकांमध्ये त्यांच्या नावे खाते सुरू केले. या खात्यामधून भामट्यांनी आर्थिक व्यवहार केले. याच व्यवहारांचे कागदपत्रे, ट्रान्झेंक्शन व इतर खोटे पुरावे वृद्धास दाखविले. तुम्ही मनीलॉन्ड्रिग केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करून अटक केली जाणार असल्याची भिती वृद्धास घातल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.