कवठेमहांकाळ : तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षाच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. संशयित शिक्षकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचे संतप्त पडसाद गावात उमटले. पालक आणि संतप्त जमावाने शिक्षकाला चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे.
संशयित शिक्षक शाळेत शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत होता. दि. ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पीडित मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केले. परंतु, वारंवार हा प्रकार होत असल्याची माहिती पालकांना मिळाली.त्यामुळे पालक लक्ष ठेवून होते. सोमवारी संशयित शिक्षकाने मुलींबरोबर अश्लील प्रकार सुरू केला- लक्ष ठेवून असलेल्या पालकांना हा प्रकार निदर्शनास आला.
संतप्त पालकांनी शिक्षक कांबळेला पकडले- त्यांनी कांबळेला चोप दिला. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी कांबळेला ताब्यात घेतले. पीडित मुलींच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. कांबळे याच्यावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे- पोलिस निरीक्षक जोतीराम पाटीला तपास करीत आहेत.