राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पोटातून तब्बल 6000 खडे निघाल्याने खळबळ उडाली आहे. पोटदुखीने त्रस्त असलेली ही व्यक्ती डॉक्टरांकडे गेली होती, यावेळी ऑपरेशन करताना हा प्रकार समोर आला.
या खड्यांचा आकार मोहरीच्या दाण्यापासून ते हरभऱ्याएवढा होता. त्यांची मोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडीच तासांहून अधिक वेळ लागला. या वृद्धाला बऱ्याच दिवसांपासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता पित्ताशय मूळ आकाराच्या दीडपट वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबत लवंडी परिसरात खासगी रुग्णालय चालवणारे, डॉक्टर जिंदाल यांनी सांगितले की, संबंधित रुग्ण अनेक दिवस त्रस्त होते.
सोनोग्राफीमध्ये त्यांच्या पित्ताशयाचा आकार 12 बाय 4 सेमी असल्याचे आढळून आले होते, जे 7 सेमी इतके असायला आहे. यानंतर रुग्णाला काल शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले. ऑपरेशनपूर्वी त्याला भूल देण्यात आली. त्यानंतर दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून सुमारे 1 तासात 6110 हून अधिक खडे काढण्यात आले. हे सर्व खडे एका पाकिटात ठेवून कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यांची मोजणी करण्यासाठी सुमारे अडीच तास लागले.