तासगाव : विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे तत्कालीन खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव झाला होता.त्यातच महिन्याभरात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्याने पुन्हा एकदा जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे भाजपकडून तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यातच माजी खासदार पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यात या भेटीने खळबळ उडाली आहे.
सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवन मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची पुणे येथे भेट घेतली आहे.त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे माजी खासदार संजय पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले.