सांगली: राज्य सरकारने गौरी- गणपतीसाठी आनंदाचा शिधा वाटण्याचे ठरवले होते. मात्र, गणेशोत्सवाचे पाच दिवस उलटून गेले, तरी अद्याप सर्व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळाला नाही. संचामधील सर्व वस्तू न आल्यामुळे रेशन दुकानदारांनी वाटप थांबविले आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, शिधावाटपाला सुरुवात केली असल्याची माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आली. राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ गौरी-गणपतीच्या सणासाठी १५ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. या शिधात रवा, चणाडाळ, साखर आणि एक लीटर तेल या चार वस्तूंच्या समावेश असलेला संच १०० रुपयांत देण्यात येणार आहे. अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना याचा लाभ होईल.
गौरी गणपतीच्या सणासाठी शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी तीन लाख ९६ हजार २९० आनंदाचा शिधा संच मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, गौरी गणपतीचे पाच दिवस उलटूनही शिधावाटपाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. जिल्ह्याच्या काही तालुक्यात केवळ तेल व साखर या वस्तू पोहोचल्या आहेत. चारही वस्तू आल्याशिवाय शिधावाटपाला सुरुवात केली जात नाही. त्यामुळे दुकानदार सर्व वस्तू येण्याची वाट पाहत असल्याची माहिती रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक उपाध्ये यांनी दिली.
शासनाकडून उपलब्ध होईल, त्यानुसार
आंनदाचा शिधा वाटप सुरु केले आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळेल. शिधा वाटपात कुठेही अडचणी निर्माण होणार नाहीत.
– आशिष बारकुल, पुरवठा अधिकारी, सांगली.
जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना १०० टक्के संच मिळणे गरजेचे होते. पण, ९२ टक्केच संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातही सहा वस्तूपैकी चारच वस्तू मिळणार आहेत. चारमध्येही तेल आहे तर डाळ नाही अशी अवस्था आहे. वाटप थांबले आहे. शासनाने १०० टक्के किट आणि सर्व वस्तू एकाच वेळी द्यावेत.
– दीपक उपाध्ये, जिल्हाध्यक्ष, जिल्हा रेशन संघटना