दसऱ्यापर्यंत चालणार सर्व्हे
विधानसभा निवडणुकीसाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. सव्र्व्हेतून निवडणुकीचे चित्र कसे असेल? याची चाचपणी संस्थांनी सुरू केली आहे. शहर व जिल्ह्यात डझनभर विविध संस्थांचे प्रतिनिधी मतदारसंघनिहाय मतदारांचा कल कसा असेल, हे जाणून घेत आहेत. सर्व्हे दसऱ्यापर्यंत पूर्ण होणार आहे. नंतर उमेदवारीबाबत राजकीय पक्षांचा निर्णय होईल.
या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील राजकीय स्थिती कशी असेल, उमेदवार कोण असतील, मुख्य लढती कोणासोबत होतील, तालुकानिहाय उमेदवारांचा आकडा किती असे शकेल, यासह इतर राजकीय माहितीसाठी काही एनजीओंचे प्रतिनिधी शहरात व तालुक्यात गोपनीय पाहणी करीत आहेत.
जिल्ह्यात भाजपाचे तीन, उद्धव सेना १, शिंदेसेनेचे पाच आमदार आहेत. लोकसभा शिंदेसेनेच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात ठाकरे सेना, भाजप, दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस व मनसेची काय स्थिती असेल, जे जाणून घेण्यासाठी स्थानिक संस्थांसह मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर भारतातून आलेल्या संस्थांचे प्रतिनिधी शहर व जिल्ह्यातील ठराविक संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या भेटी घेऊन माहिती संकलित करीत आहेत. वैजापूर, पश्चिम, मध्य, सिल्लोड, पैठण या तालुक्यांचे आमदार शिंदे गटात आहेत.कन्नडचा आमदार ठाकरे गटाकडे आहे. पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर- खुलताबाद या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे.
काय आहेत सर्व्हेतील प्रश्न? लोकसभा निवडणूक निकालाचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार, लोकभावना कुणाकडे झुकली आहे, मराठा आरक्षण फॅक्टरचा काय परिणाम होईल, ठाकरे सेनेला असलेली सहानुभूती संपली की आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांचा फायदा भाजपाला किती प्रमाणात होईल, शिदे गटाचे आमदार पुन्हा निवडून येतील का, राज्यात २०१९ नंतर आजपर्यंत झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाकडे मतदार कसे पाहतात, महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार कोण असावेत?, स्पर्धेमध्ये सरस कोण आहेत, शासनाच्या योजनांचा मतदानावर काय परिणाम होईल, याची माहिती एनजीओचे प्रतिनिधी संकलित करीत आहेत. हे प्रतिनिधी बाहेरच्या राज्यातील असून मागील काही एक्झिट पोल फोल ठरल्यामुळे ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे, याबाबत सव्र्व्हेतून कानोसा घेतला जात आहे. यात सगळ्याच राजकीय पक्षांच्या संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्याचा घेत आहेत आढावा
मराठवाड्यातील ४६ आमदारांमध्ये भाजपकडे १६, शिवसेना शिंदे गट ९, ठाकरे गट ३. काँग्रेस ८, राष्ट्रवादी काँग्रेस ८, रा.स.प.-१, पीडब्ल्यूपी १ असे ४६ आमदार आहेत. मराठवाड्यातून लोकसभेवर शिंदेसेना १, काँग्रेसचे ३, श. प. राकाँ १, ठाकरे सेनेचे ३ खासदार विजयी झाले. भाजपाकडे एकही जागा नाही.