माणिकनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रिया नाईक (वय ४४) यांचा शुक्रवारी झालेल्या खूनप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरण्यास आईकडून निर्बंध घातल्याच्या रागातून प्रिया नाईक यांची विवाहित मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक (वय २५) हिनेच विवेक पाटील व विशाल पांडे या दोघांना आईच्या खुनाकरिता १० लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पनवेल पोलिसांनी प्रणाली प्रल्हाद नाईक आणि १० लाखांची सुपारी घेऊन खून करणारे विवेक पाटील व विशाल पांडे अशा तिघांनाही अटक करून पनवेल न्यायालयालयासमोर हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.
एखाद्या सिनेमा वा मालिकेतील कथानकाला साजेशी अशी ही खुनाची घटना पनवेलमधील मध्यवर्ती भागातील माणिकनगर सोसायटीत घडल्याने एकच खळबळ माजली होती. मुलगी प्रणाली नाईकने पोलिसांना दिलेल्या जवानीतून हे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे.
मुलगी प्रणाली ही विवाहित असून, तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती गेल्या दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये- जा करण्यास तसेच फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे तसेच तिच्या मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशाची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. प्रणालीलाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यावदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. त्याने आपला मित्र विशाल पांडे याच्या मदतीने १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया नाईक या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली.