शहर व परिसरात मागील काही महिन्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीनांपासून तर वयोवृद्धापर्यंत स्त्री-पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याची अकस्मात नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये आहे. २०२४ साली फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत आत्महत्येच्या घटना वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. या घटनांनी शहरवासीयांना वेळोवेळी हादरविले, आत्महत्येमागील विविध कारणे असून अनेकदा कारणेही समोर येत नाहीत अन ते एकप्रकारचे गूढ राहते. काहींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. त्यावरून कारणे समोर येतात अन् मग पोलिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करतात. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ मे रोजी दहावीचा पेपर देऊन घरी आलेल्या शाळकरी मुलीने आई वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तिने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून हे कारण समोर आले होते.
कौटुंबिक तणावातून आत्महत्या
• अंबड पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना पोलिस इन्स्पेक्टरने स्वतःच्या सव्र्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती.
■ या घटनेने संपूर्ण शहर पोलिस दल हळहळले होते. कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय त्यावेळी व्यक्त झाला होता; मात्र नेमके कारण अद्यापही पुढे आलेले नाही.
■ या घटनेनंतर शहर पोलिस दलाने पोलिसांचे समुपदेशन सत्रदेखील राबविले होते.
नववीच्या मुलाची दहाव्या मजल्यावरून उडी!
■ गंगापूररोड भागात उच्चभ्रू गृहप्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून नववीत शिकणाऱ्या मुलाने शालेय गणवेशात २० मे रोजी सकाळच्या सुमारास उडी घेतली होती.
• या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली होती. त्याच्याही आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.
दोन्ही मुलींचा गळा आवळून आईने दिला जीव
पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने पोटच्या दोन्ही चिमुकलींना गळा आवळून ठार मारत स्वतः ही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आडगाव शिवारात ८ मे रोजी सकाळी घडली होती. आत्महत्येपूर्वी मायलेकींनी बनविलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओने संपूर्ण शहर हळहळले होते. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.
नागरिकांनी आपल्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नैराश्याची पातळी उच्चस्तरावर पोहोचल्यावर असे विचार मनात डोकावू लागतात अन् वैचारिक शक्ती खुंटण्यास सुरुवात होते, तेव्हा असे टोकाचे पाऊल उचलले जातात. नकारात्मक विचारांची घालमेल सुरु झाल्यास किंवा नैराश्य जाणवू लागल्यास आपल्या जवळच्या मित्र- मैत्रिणीकडे अथवा आई, वडिलांकडे किंवा जी व्यक्ती जवळची वाटते तिच्याकडे स्वतःला व्यक्त करावे, त्यातून अनेकदा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.
– डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचारतज्ज्ञ