मुंबई येथून एका गतिमंद मुलीस वाशी येथे आणून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. पीडितेला एका पडक्या खोलीत डांबून ठेवल्यानंतर ओरडण्याचा आवाज ऐकून पोलिसांनी तिची सुटका केली. – याप्रकरणी सोमवारी रात्री एका आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास वाशी पोलिसांनी ताब्यातही घेतले.
शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पडक्या घराच्या कुलूपबंद खोलीतून मुलीचा ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता खोलीत मुलीस डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सुटका केल्यानंतर ती गतिमंद असल्याचे लक्षात आले. तातडीने पोलिसांनी या मुलीला वाशीत आणणारा आरोपी दत्ता माणिक गायकवाड यास ताब्यात घेतले.
त्याने पीडित मुलीस मुंबईच्या चेंबूर भागातून लग्न करून १४ सप्टेंबर रोजी वाशीत आणल्याचे सांगून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली. मुलीने हा प्रकार मनाविरुद्ध झाल्याचे सांगितल्याने पोलिसांनीच पुढाकार घेत महिला पोलीस कर्मचारी स्नेहलता लोमटे यांनी फिर्याद दिली.