अनैतिक संबंधावरून तरुणाचा गळा चिरला | बिहारच्या शिक्षकासह दोघे अटकेत

0
6

अनैतिक संबंधाच्या संशयावरून शिक्षकाने नातेवाईक महिलेच्या प्रियकराचा झोपेतच चाकूने गळा चिरून खून केला. बावधन येथे एका नर्सरीमध्ये मंगळवारी (दि. १८) रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.प्रवीणकुमार भोला महतो (२६, मुझ्झफरनगर, बिहार) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजीवकुमार नथुनीप्रसाद सिंह (३३) आणि त्याचा साथीदार धीरजकुमार रमोदसिंग (२०, दोघे रा. मुजफ्फरनगर, बिहार) यांना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीवकुमार शिक्षक आहे. त्याच्या नातेवाईक महिलेशी प्रवीणकुमारचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून खुनाचा कट रचून राजीवकुमार बिहार येथून पुण्यात आला. नर्सरीमध्ये झोपेत असलेल्या प्रवीणकुमारचा चाकूने गळा चिरून खून केला.

 

खून केल्यानंतर राजीवकुमार आणि धीरजकुमार हे मानपाडा मार्गे बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त कुराडे यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मानपाडा येथून दोघांना जेरबंद केले. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात, निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, श्रेणी उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

महिलेचाही करणार होता खून

नातेवाईक महिलेशी प्रवीणकुमार याचे चार वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचा संशय राजीवकुमार याला होता. दरम्यान, मागील महिन्यात प्रवीणकुमार आणि महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर राजीवकुमारने प्रवीणकुमारचा खून केला. बिहार येथे गेल्यानंतर संबंधित नातेवाईक महिलेचाही खून करण्याचा त्याचा कट होता. मात्र, पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्याने राजीवकुमार याचा डाव फसला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here