तासगाव पूर्व भागातील गव्हाण, मणेराजुरी, अंजनी, सावळज, वज्रचौंडे परिसरात शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
गव्हाण, वज्रचौंडे, सावळज, डोंगरसोनी, अंजनी, बिरणवाडी, खुजगाव, सिद्धेवाडी, दहिवडी परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे द्राक्ष बागातून व रस्त्यातून पाणी वाहू लागले. अग्रणी नदीला यापूर्वी जून महिन्यात पूर आलेला होता. सिद्धेवाडी तलाव, अंजनी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागलेले आहेत. शेतातील ताली भरून पाणी साचले आहे.
गव्हाण परिसरात रविवारी पहाटेपर्यंत पाऊस चालू होता. उशिरापर्यंत पाऊस चालू राहिल्याने गव्हाणला अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गव्हाण-मणेराजुरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.शनिवारी रात्रीपासून तासगाव तालुक्याला पुन्हा पावसाने झोडपून काढले. सावळज आणि वायफळे मंडलात अतिवृष्टी झाली. मांजर्डे मंडलातही ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात २४ तासांत ५२.६ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील ओढे, नाले पात्राबाहेर पडले आहे. खरिपाचे नुकसान झाले असून द्राक्ष बागायतदार संकटात सापडले आहेत.द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुंडूब भरल्या आहेत.