माहेरहून गाडी खरेदीसाठी पाच लाख रूपये घेऊन ये असे म्हणत सातत्याने विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून देण्याची घटना रेड्डे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी विठलापूर (ता. आटपाडी) येथील सानिका सिद्धेश्वर नवत्रे हिने आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार पती, सासू, सासरा, नणंद अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता सानिका हिला पती सिद्धेश्वर सुखदेव नवत्रे, सासू हौसाबाई नवत्रे, सासरा सुखदेव नवत्रे, नणंद कविता ढगे (रा. नवत्रेवस्ती, रेड्डे, ता. मंगळवेढा) यांनी संगनमताने माहेरहून नवरा सिद्धेश्वर यास गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत म्हणून तगादा लावला. त्यासाठी सातत्याने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला. त्यानंतर सानिका हिच्याकडील दागिने काढून घेऊन तिला घरातून हाकलून लावले.