कामगाराचा मुलगा झाला श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते, अनुरा कुमार दिसानायके विजयी झाले आहेत. या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी लागणारा ५० टक्क्यांपेक्षा अधिकचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या इतिहासात प्रथमच मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली. या फेरीत आघाडी घेतल्याने निवडणूक आयोगाने दिसानायके यांना विजयी घोषित केले. देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून दिसानायके सोमवारी शपथ घेणार आहेत.
मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुनी पक्षाच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पॉवरचे (एनपीपी) राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार अनुरा कुमार दिसानायके (५६) यांनी प्रतिस्पर्धी व समागी जन बालवेगया पक्षाचे उमेदवार साजिथ प्रेमदासा यांचा पराभव केला.
उशिरा आलेल्या निकालानुसार एनपीपीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार दिसानायके यांनी एकूण मतांपैकी ५६.३ लाख (४२.३१ टक्के) मते घेतली; तर प्रेमदासा यांनी ४३.६ लाख (३२.०८ टक्के) मते घेतली यानंतर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आर. एम. ए. एल. रत्नायके यांनी दिसानायके यांना विजयी घोषित केले. २०२२ नंतरच्या आर्थिक संकटामुळे दिवाळखोरीत निघालेल्या श्रीलंकेत शनिवारी प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान झाले.