जत : जत तालुक्याला आज, मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी काढणी केलेल्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे.सांगली जिल्ह्यासह तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. पुढील तीन आठवडे अर्थातच १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, राज्यात परतीचा पाऊस यंदा फारच बरसण्याची शक्यता आहे.
अतिवायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता आणि इतर काही वातावरणीय बदल यामुळे राज्यात सर्वत्र पावसाने जोर पकडलेला आहे.सर्व ठिकाणी मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार झोडपले.दुसऱ्या आवर्तनातील पावसाची ही सुरुवात असल्याने तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून रात्रीपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस झाला.जत पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. या पावसामुळे शेती मशागती आणि खरीप पीक काढणी कामाचा उरक शेतकऱ्यांनी वाढवला आहे.
शहरात पाणीच पाणी; नागरिकांची तारांबळ
जत शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले हाेते.यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.