भाचीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी मामाने भाचे जावयाच्या खुनाची सराईत गुन्हेगारांना सुपारी दिल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. खुनाची सुपारी घेणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शिवनाथ ज्ञानदेव चवरे (वय ४१, रा. जवळके खुर्द, ता. नेवासा), ज्ञानदेव ऊर्फ नारायण सूर्यभान लष्करे (४२, रा. पावन गणपतीसमोर, नेवासा), संदीस साहेबराव धनवडे (३९, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी शिवनाथ चवरे याच्या भाचीचे शंतनू पोपट वाघ याच्याशी २०२२ मध्ये लग्न झाले होते. तिने गेल्यावर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा बदलाघेण्यासाठी आरोपी चवरे याने इतर आरोपींना शंतनू वाघच्या खुनाची सुपारी दिली. आरोपी हे शंतनू वाघ याच्या मागावर होते. शंतनू सोमवारी (दि. १६) पुणे येथून मोटारसायकलवरून नेवासा फाटा येथील खडीक्रशवर जात होता. त्यावेळी आरोपींनी चारचाकीतून पाठलाग करीत शंतनू वाघ यांच्या मोटारसायकलला जोराची धडक देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात शंतनू वाघ जखमी झाला.
त्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार गंभीर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हा शोध हाती घेत ठिकठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासांसाठी नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक तुषार धाकराव, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, आदींच्या पथकाने केली.