जत : जत पंचायत समितीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील २९ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मागील महिन्यात या योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानुसार आज २९ गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासोबत सखोल व सकारात्मक चर्चा झाली. पाटबंधारे विभागाकडून सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे आणि लवकरच या गावांचा पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवला जाणार आहे.
या योजनेमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येतील असा विश्वास आहे. जत तालुका हा पूर्वीपासूनच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. परंतु पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याचे आपण दिलेले वचन पूर्ण होत आहे आणि आता प्रत्येक गावात पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या तालुक्याला हिरवे करण्याचा आपला निर्धार असून लवकरच हा भाग समृद्ध आणि हिरवागार होईल,असे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले.या प्रसंगी गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.