संख : जत तालुक्यातील भिवर्गी फाटा पांडोझरी येथील वीरभद्रेश्वर बेदाणा प्रोसेसिंग युनिटमधील २ हजार ३८५ किलो वजनाच्या २ लाख ७७ हजार ९५१ रुपये बेदाण्याच्या व्यवहारात कामगार लालू जगनाथ कुशवाह (रा. गुटीना, ता. मुरार, जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) याने अपहार केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री घडली असून, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याबाबतची फिर्याद प्रवीण तुकाराम अवरादी (वय ३१, रा. संख, ता. जत) – यांनी उमदी पोलिस ठाण्यात दिली आहे. पूर्व भागातील संख येथील प्रवीण तुकाराम अवरादी यांचे भिवर्गी फाटा पांडोझरी येथे वीरभद्रेश्वर बेदाणा प्रोसेसिंग युनिट आहे. गेली १० वर्षांपासून युनिट सुरू आहे.
येथे सुरुवातीपासून मध्य प्रदेश येथील लालू कुशवाह कामगार म्हणून काम करीत असून, युनिटमध्येच तो राहतो. प्रवीण अवरादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेदाणाच्या व्यवहारात लालूने एकूण २ लाख ७७ हजार ९५१ रुपयांचा अपहार केला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.