वायफळेच्या मंडळ अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच : एक खासगी इसमही ताब्यात

0
7
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी बस्तवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
वायफळे येथे मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून वैशाली वाले यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. पैसे दिल्याशिवाय नोंद केली जात नव्हती. अनेक सामान्य लोक वाले यांच्या या छळाला कंटाळले होते. वायफळे येथील तलाठी कार्यालयासह मंडळातील इतर तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नव्हते. बारीक-सारीक कामासाठीही पैशाची मागणी केली जात होती. त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक लुबाडणूक होत होती.
याप्रकरणी मंडळ अधिकारी वाले यांना काही लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या होत्या. सामान्य लोकांची कामे तातडीने करा. लोकांना आर्थिक भुर्दंड लावू नका. अनावश्यक पैसे घेऊन त्यांची लुबाडणूक करू नका, अशा सूचना वेळोवेळी देण्यात आले होत्या. मात्र वैशाली वाले यांच्या कारभारात कसलीही सुधारणा होत नव्हती. पैसे दिल्याशिवाय त्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या. एकाही कागदावर सही करत नव्हत्या, अशा तक्रारी होत्या.
       त्यांच्या कारभाराला सामान्य लोक अक्षरशः कंटाळले होते. दरम्यान, बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले होते. दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. वाले यांच्या विरोधात रीतसर तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांच्या विरोधात वायफळे येथे सापळा लावला.
तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले.यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले. यावेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांना रंगेहाथ पकडले. वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
   
या कारवाईमुळे तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाले यांच्या कारभाराची यानिमित्ताने पोलखोल झाली आहे. वाले यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे. दरम्यान वाले यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्याने वायफळे मंडळात आनंदाचे वातावरण आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here