जत : जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरघाव वेगाने निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्याच्या कळपात घुसला. यात सुदैवाने मेंढया राखणारी महिला बचावली. या घटनेत ट्रकच्या धडकेने चार मेंढया या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेवून डोंगर भागात निघाल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास भरघाव वेगाने निघालेला ट्रॅक (एमएच ११/ एएल- ८४८) मेंढ्याच्या कळपात घुसला. या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जावून पडल्या.
या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालबाल बचावल्या.या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. याच वेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे संख येथून जतला निघाले होते. यावेळी त्यांच्या संवेत मानव मित्र संघटनेचे सिद्धराया मोरे,
पिटु मोरे, कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोतदार होते.
ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विव्हळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता. वाद टोकाला चालला असल्याने हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली. ट्रक चालकाने दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती. अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत होरे कुटूंबियांना आर्थिक मदत केली.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत. रस्त्यावर भरघाव वेगाने जाणारे वाहने व्यवस्थित चालवणे गरजेचे आहे अन्यथा मुक्या जिवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो. आशा घटना तालुक्यात होवू नयेत. अशा घटनेवेळी शासनाने व प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी तसेच दानशूर व्यक्तीनी होरे कुटूंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन केले.