भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ या मोहिमेचा सहावा टप्पा सुरू करण्यात आला आहे. ही मोहीम १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ती ३१ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ या देशव्यापी मोहिमेंतर्गत, देशभरातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४.५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसी कागदपत्रे वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीची कागदपत्रे देण्यात येणार आहेत. यात पीकविम्याशी संबंधित सर्व माहिती त्यांना दिली जाईल.
शेतकऱ्यांना जागृत करणे, प्रोत्साहित करणे आणि सक्षम करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भारत सरकार पीकविमा पाठशाळा तसेच पीकविम्याबद्दल कमी जागरूकता असलेल्या भागात पथनाट्यांचे आयोजन करणार आहे.
मिळेल आर्थिक संरक्षण
हवामानातील बदल आणि अप्रत्याशित हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना, ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.खरिपाच्या हंगामात २०२३ मध्ये ८.६५ कोटी विमा अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी ९ कोटी पेक्षा जास्त अर्ज आले.