एका जिल्हा परिषद शाळेतील आठवीचे विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील शब्द उच्चारून व विनाकारण छडीने मारहाण करणार्या प्राथमिक शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत बुधवारी (दि. २) गुन्हा दाखल झाला. शाळेत निर्भया पथकाने बसविलेल्या तक्रारपेटीतून सदर प्रकार लक्षात आला आहे.
दत्ता गंगाधर होगे (४५) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मागील एक वर्षापासून शहरातील मोंढा परिसरातील एका जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. शाळा नुकतीच नव्या इमारतीत स्थलांतरित झाली असून येथे ४ ते ५ महिन्यांपासून काका, दीदीचे निर्भया पथकातील महिला अंमलदार नियमित भेटी देऊन सर्व विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टचबद्दल माहिती व शाळेत ये-जा करताना कोणी पाठलाग करतात का? त्रास देतात का? अश्लील भाषेत कोणी बोलते का याबाबत विचारणा करून मार्गदर्शन करतात.
तसेच शाळेत तक्रारपेटीही बसविली आहे. मंगळवारी (दि.१) सकाळी ११:३० वाजता शाळेत ठाण्यातील निर्भया पथकातील अंमलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फय्याज यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील होगे शिक्षकाविरुद्ध तक्रार असल्याचे सांगत शाळेतील पेटीत तक्रार टाकल्याचे सांगितले. सदर तक्रारपेटी उघडली असता होगे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी सापडल्या. याच्या चौकशीनंतर शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर बुधवारी (दि.२) दुपारी येथील पोलीस ठाण्यात होगे यांच्याविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसमोर अश्लील शब्द उच्चारून विनाकारण छडीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार दिगंबर पाटील करीत आहेत.