संख : जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र गुड्डापूर येथे गडी प्रदेश अभिवृद्धी प्राधिकार, कर्नाटक राज्य कन्नड सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन विजयपूर आणि महाराष्ट्रातील सर्व कन्नड शैक्षणिक संघ, संघटना आणि श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक महोत्सव ५० उत्साहात पार पडला.यावेळी कन्नड सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर गडीनाड चेतन राज्य पुरस्कार सोहळा आणि महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि होरनाड कन्नडीगर संमेलन पार पडले.
या महोत्सवाचे उद्घाटन कर्नाटकचे समाज कल्याण आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज एस. तंगडगी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री सोमण्णा बेवीनमरद, साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजुगौडा पाटील, सचिव चंद्रशेखर गोब्बी, विजयपूरचे जिल्हाधिकारी टी. भूबालन, विजयपूर जि.पं. मुख्य कार्यकारी रिषी आनंद उपस्थित होते. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या संचालिका धरणीदेवी मालगत्ती यांनी स्वागत केले. सोमण्णा बेवीनमरद यांनी प्रास्ताविक केले.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, या महोत्सवाने कर्नाटक महाराष्ट्र जनतेची समरसता वाढण्यास मदत होईल. एकमेकांना संस्कृती आणि परंपरा समजते. उन्हाळ्यात जत तालुक्यात तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मंत्र्याकडे केले. यावेळी मंत्री शिवराज थांगडगी यांच्या हस्ते बॉर्डर स्पिरिट स्टेट अँवॉर्ड सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कलाकारांनी बहारदार कला अविष्कार सादर केला. दिव्या आलूर यांनी सूत्रसंचालन केले.
सांस्कृतिक विभागाचे मंत्री शिवराज तंगडगी म्हणाले, हा ऐतिहासिक महोत्सव सीमाभागातील लोकांच्या एकात्मता आणि समरसतेसाठी केला आहे. गुड्डापूरदानम्मादेवी मंदिरात कर्नाटकातील लोक मोठ्या संख्येने येत असल्याने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.