सोलापूर ; लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अपयश आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे. अजित बंडखोरीनंतर पवारांच्या अस्वस्थ झालेले शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावत लोकसभा निवडणुकीत आपला पॉवर सिद्ध केला आहे. ज्येष्ठ पवारांच्या करिष्ट्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) सह भाजपा नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कंबर कसली असून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांविरोधात त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर गत महिनाभरात त्यांनी भाजपालाही हादरे देण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपा नेते समरजितसिंह घाटगे -यांचा राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये प्रवेश करून महायुतीला धक्का दिला आहे.
त्यानंतर आता माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले हर्षवर्धन पाटील यांनाही गळाला लावले आहे. शरद पवारांच्या डावपेचामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आपले नेते राखताना दमछाक होत आहे.कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात दोन नेते गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती. आता रणजीतसिंह मोहिते पाटीलसुद्धा तुतारी हाती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.
पाटील सध्या भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र. त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य शरद पवारांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडी सोबत जाणार का? अशी चर्चा आहे.अकलूज किंवा पंढरपूरचा आमदार नको माढा विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक असले तरी विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, अभिजीत पाटील आणि रणजीत सिंह मोहिते पाटील ही तीन प्रमुख नावे स्पर्धेत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आम्हाला अकलूज किंवा पंढरपूरचा आमदार नको आणि बबनराव शिंदे यांना पक्ष प्रवेश नको, अशी भूमिका इतर इच्छुकांनी उघडपणे घेतली आहे.
राजेंद्रअण्णा देशमुखांचा भाजपाला धक्का
शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत होते. जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी राकों पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आटपाडीचे भाजपा नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. तसेच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.