कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी माजी खासदार संजय पाटील यांच्या गटाचे अजित माने अजित बाळासाहेब माने यांचा एकमेव अर्ज शिल्लक असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आबा व काका गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला होता. त्यामुळे मोठ्या चुरशीने निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अर्ज माघारी घेण्याची नामुष्की ओढवल्याने रोहित पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सिंधूताई गावडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या नगरपंचायतीच्या खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाकडून राहुल जगताप यांचा एक व संजय पाटील गटाकडून अजित माने, शीतल पाटील, रणजीत घाडगे यांचे प्रत्येकी एक असे एकूण चार अर्ज दाखल झाले होते.
शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून राहुल जगताप आणि संजय पाटील यांच्या गटाकडून शीतल पाटील व रणजीत घाडगे यांनी अर्ज मागे घेतले. सायंकाळी चार वाजेपर्यंत माघार घेण्याच्या अंतिम दिवशी तिन्ही अर्ज माघार घेतल्याने अजित माने यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे सोमवार दि. ७ ऑक्टोबरला जाहीर होईल. बिनविरोध निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.