नागरिकांच्या प्रलंबित समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

0
22
जत : जत पंचायत समिती येथे नगरपरिषद, आरोग्यविभाग, वनविभाग आणि पोलीस विभाग यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत सर्व विभागांच्या चालू कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला आणि विविध प्रलंबित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली.
बैठकीत स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील योजना ठरविण्यात आली.तसेच शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आरोग्य केंद्रांमधील सुविधा वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. जलपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी जलद कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.
वनविभागाच्या अंतर्गत हरित क्षेत्रांचे संरक्षण आणि वृक्षारोपण कार्यक्रमांची प्रगती देखील तपासण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि हरित पट्ट्यांच्या वाढीसाठी आगामी काळात व्यापक मोहीम राबवण्याचे ठरविण्यात आले.
याशिवाय, पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अधिक गस्त आणि सतर्कता बाळगण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.शहरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जलद आणि परिणामकारक काम करण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना, प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी एकत्रितपणे आणि तत्परतेने काम करण्याची सूचना देण्यात आली. या सर्वांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here