दिवाळीच्या खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदा बाजार सजले आहेत. नवीन कपडे, दागिने वगळता यंदा महागड्या स्मार्टफोनची विक्री जोरात सुरु आहे. ऑक्टोबरच्या केवळ पहिल्या दोन आठवड्यांतच ४५ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या स्मार्टफोनची विक्री १२ टक्केपेक्षा अधिक वाढली आहे, असे ‘काऊंटरपॉईंट’ या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दिवाळीचा हंगाम संपेपर्यंत देशभरात ३.५ कोटी स्मार्टफोन विकले जातील, असा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे.
संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या स्मार्टफोनच्या विक्रीपैकी ३० टक्के विक्री या सणासुदीच्या हंगामात होते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड तसेच यूपीआयच्या मदतीने बहुतांश खरेदी केली जात आहे. ३ ते १२ ऑक्टोबर या काळात रेजरपेवर क्रेडिट कार्डने झालेल्या व्यवहारांमध्ये १०६ टक्के वाढ झाली आहे तर यूपीआय व्यवहार ६० टक्के वाढले आहेत.
सणासुदीच्या दिवसांमुळे सप्टेंबरमध्ये ई-वे बिलचे प्रमाण १८ टक्के वाढून १०.९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या आर्थिक व्यवराहातून मोठ्या प्रमाणावर जीएसटी वसूल झाला आहे. याचा अर्थ असा आहे की सणासुदीच्या निमित्ताने नागरिक जोदरार खरेदी करीत आहेत.
कपड्यांची मागणी १५ टक्के वाढणार
व्यापाऱ्यांनी सांगितले की, दोन आठवड्यांत कपड्यांची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. ‘वीमार्ट’च्या माहितीनुसार दिवाळीनंतरच्या काळातही कपड्यांच्या विक्री वाढताना दिसेल. ‘सेंट्रम’च्या मते सणाच्या काळात कपड्यांची मागणी १५ टक्के वाढू शकते.
पेमेंटच्या एकूण व्यवहारांमध्ये ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये लग्नसराईचा हंगाम सुरु होत असल्याने बाजारातील उलाढाल वाढणार आहे.