सर्व प्रयत्न करूनही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली पॅटर्नप्रमाणे १८ जागांवर काँग्रेस आणि उद्धव सेनेमध्ये लढत आहे. बहुतांश जागांवर आघाडीत एकमत झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. या १८ जागांबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेईल. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव सेनेमध्ये जोरदार लढत झाली होती. काँग्रेसकडून विशाल पाटील यांना या जागेवर उभे करायचे होते, परंतु उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत चंद्रहार यांचा पराभव केला. त्याच सांगलीच्या धर्तीवर १८ विधानसभा जागांवर काँग्रेस आणि उबाठा गटात एकमत होत असल्याचे दिसत नाही.
ठाकरेंच्या पहिल्या यादीत वरळीतून आदित्य : शिवसेना (उबाठा) पक्षाने बुधवारी संध्याकाळी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली. वांद्रे पूर्व मतदारसंघातून युवासेना नेते व ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव यांच्यासोबत असलेल्या १५ पैकी १४ जणांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे:शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पहिल्या यादीत २००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून लढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी हुक्कमी एक्का उभा केला आहे. या जागेवरून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना यउमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. त्यामुळे शिंदेविरोधात आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
२७० वर सहमती १८ जागांवर तेढ : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ असा फॉर्म्युला निश्चित झाला असून मित्रपक्षांना झुकते माप देण्याचा निर्णय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना (उबाठा) पक्षाने घेतला आहे. मोठ्या संघर्षानंतर बुधवारी २८८ पैकी २७० जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले. २७० पैकी १५ जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. उद्धव गटाची यादी जाहीर करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उर्वरित १८ जागांवर लवकरच निर्णय घेतला जाईल, असा खुलासा केला. बहुधा यातील बहुतांश जागांवर काँग्रेस आणि शिवसेना लढत आहेत. महाविकास आघादीच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई यांच्या उपस्थितीत पत्रपरिषद पार पडली. यावेळी संजय राऊत म्हणाले, मविआची बैठक शरद पवार यांच्या सोबत पार पडली. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्याचे आदेश दिले. मविआचे जागावाटप समाजवादी पार्टी, शेकाप यांना सामावून घेणारे जागावाटप असेल असे राऊत म्हणाले.
उर्वरित जागांवर मित्रपक्षांशी चर्चा:प्रमुख तिन्ही पक्षानी प्रत्येकी ८५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला घेत २७० जागांवर यादी बनवलेली आहे. या प्रकारे २८८ जागा मविआ पूर्ण ताकदीने लढेल, असे संजय राऊत म्हणाले. नाना पटोले म्हणाले, तीन प्रमुख पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासोबत झाली. १८ जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. गुरुवारी या जागांवर स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.