माण ; तालुक्यातील धामणी येथील ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय २५) या विवाहितेने तीन महिन्याच्या शिवाणी व सहा वर्षाच्या स्वरांजली यांना कंबरेला ओढणीने बांधून घराशेजारी असणाऱ्या तलावाच्या पाण्यात उडी मारुती आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
घटना ग्रामस्थांना कळल्यानंतर परिसरातील लोक तलावाच्या जवळ जमा झाले. पती स्वप्नील यास घटना कळल्यावर त्याने तलावाकडे धाव घेऊन पाहिले तर आपली पत्नी व दोन मुली पाण्यावर तरंगत आहेत. हा धक्का सहन न झालेल्या स्वप्नीलने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी म्हसवड पोलिसात आकस्मित म्हणून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी स्वप्नील व ऐश्वर्या यांची कराड येथे ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि सहा वर्षापूर्वी २०१८ साली दोघांनीही प्रेमविवाह केला. स्वप्नील व ऐश्वर्या हे दोघेही धामणी या आपल्या मुळगावी आले. दोघांचा संसार छान गोडी गुलाबीने सुरू होता स्वप्नील गवंडी काम करायचा त्याची मंडळी ही काम करत होती. सात वर्षांच्या या सुखी संसारात स्वरांजली (वय ६), गीतांजली (वय ४) तर तिसरी शिवानी ही अवघ्या ३ महिन्याची गोंडस मुलगी होती. तिन्ही मुली होत्या. काल सोमवारी संध्याकाळी चव्हाण कुटुंब जेवण करून झोपी गेले असताना मंगळवारी सकाळी ऐश्वर्या यांची तिसरी मुलगी गितांजली ही आजीसोबत रात्री झोपली होती. ती आईकडे आली तर खोलीत आई व दोन बहिणी नसल्याचे दिसले.
तिने वडिलांकडे चौकशी केली असता वडील झोपेत होते मला नाही माहिती म्हटल्यावर गीतांजली पुन्हा आजीकडे व आजोबांकडे याबाबत विचारले. तेही दोघे एकमेकाकडे बघू लागले स्वप्नीलकडे येवून पुन्हा शोधाशोध सुरू केली. ऐश्वर्या व दोन मुली घरात नाहीत कोठे गेल्या, कोणाला सांगून गेल्या याबाबत घरात कोणाला काहीच माहिती होत नव्हती. शोधाशोध सुरू असताना तलावामध्ये मृतदेह तरंगत आहे, असे समजताच तलावाकडे स्वप्नील व घरातील मंडळी गेल्यावर ऐश्वर्या हिची चप्पल तलावाजवळ होती. ऐश्वर्या हिने तलावाच्या पाण्यात उडी मारताना आपल्या ओढणीने शिवानी व स्वरांजली यांना कंबरेला बांधून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना ऐन दीपावलीच्या धामधुमीत घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या तिहेरी आत्महत्येचा तपास म्हसवड पोलीस करत आहेत.