दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदी-विक्रीची धूम असून हा सण आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला. आचारसंहिता कालावधीत होणाऱ्या उलाढाली व देवाण- घेवाणीवर कडक नजर ठेवावी, असे निर्देश निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांनी सर्व यंत्रणांना दिले. निरीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी सर्व लेखाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय खर्च निरीक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन व सोभान सूत्रधार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, सर्व नोडल अधिकारी व उपस्थित होते.
यावर बारीक लक्ष ठेवा… दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या उलाढाली, भेटवस्तू देवाण-घेवाण यासारख्या व्यवहारांवर नजर ठेवावी. त्यासाठी बँक खात्यांवर जमा होणारी व काढली जाणारी रोकड, ऑनलाइन होणारे व्यवहार, झीरो बॅलन्स खात्यांवर अचानक जमा होणाऱ्या रकमा, कपडे, दागिने, भेट वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खरेदी अशा बाबींवर लक्ष ठेवावे. तसेच मद्यविक्री, रेल्वे, बस, विमानतळ याठिकाणी खासगी वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश निरीक्षकांनी दिले.
पैशांचा वापर होताच आयकर विभागाला कळवा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने थेट जनतेला आवाहन केले आहे.अशाप्रकारे रोख रकमेचा वापर, वाटप, रकमेची वाहतुकीची माहिती नागरिकांनी आयकर विभागाला द्यावी. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.सर्व ९ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी काळ्या पैशाच्या वापराची माहिती गोपनीयरित्या द्यावी.त्यासाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक, ई-मेलवरही माहिती देण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.