जत तालुक्याच्या अविरत विकासासाठी महाविकासआघाडीचे उमेदवार आ. विक्रम सिंह सावंत यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केले.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सावंत यांनी सांगितले की, “२०१९ मध्ये आपल्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली असून, जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. दुष्काळग्रस्त जत तालुका नंदनवन करण्यासाठी विकासाचे भरीव पाऊल उचलले आहे. महैशाळ योजनेमुळे तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागातील शेतीला जलसिंचन लाभले आहे, तसेच जत पूर्व भागासाठीही कर्नाटक सरकारकडून पाठपुरावा करून पाणी उपलब्ध करून दिले आहे.”
तसेच, येणाऱ्या २३ नोव्हेंबरला महाविकासआघाडीचे सरकार येईल आणि जत तालुका सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हासमोर मतदान करून आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले.
या कार्यक्रमास माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, विधानसभेचे सदस्य राजू कागे, तसेच महाविकासआघाडीचे अनेक पदाधिकारी आणि जत तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.