तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक मराठा उमेदवारांनी अर्ज भरावेत, असे आवाहन ऍड. कृष्णा पाटील यांनी केले आहे. या मतदारसंघासाठी कोणताही अधिकृत उमेदवार मनोज जरांगे – पाटील यांनी अद्याप जाहीर केलेला नाही. तरी सर्व इच्छुकांनी 29 ऑक्टोबरपूर्वी आपले उमेदवारी अर्ज भरावेत. मात्र अंतिम आदेश जरांगे यांचा असेल, असेही पाटील म्हणाले.
अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी पेटली. त्यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. राज्यभरातून मराठा आरक्षणाची मागणी होऊ लागली. सरकारवर जहरी टीका होऊ लागली. मात्र सरकारने मराठ्यांना अपेक्षित आरक्षण दिलं नाही. कुणबी व मराठा एकच आहेत, हे मान्य करायला सरकार तयार नाही. मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये मराठा समाजात सरकारविषयी संतप्त भावना आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे – पाटील यांच्या आदेशाने सत्ताधारी अनेक खासदारांना पराभूत करण्याचे काम मराठ्यांनी केले आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची ताकद कळली आहे. मराठ्यांच्या रोषामुळे अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतरही सरकारला जाग आली नाही. शेवटपर्यंत मराठ्यांना शाश्वत, टिकणारे व अपेक्षित आरक्षण दिले गेले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे – पाटील यांनी अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी गणित जुळतंय त्या ठिकाणी मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर कुठे लढायचं व कुठे पाडायचं याबाबतही चर्चा झाली आहे. ठिकठिकाणी मराठा उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मनोज जरांगे – पाटील यांनी कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने इच्छुक मराठा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत. अंतिम आदेश मनोज जरांगे – पाटील घेतील, असे आवाहन ऍड. कृष्णा पाटील यांनी केले आहे.