पांढरेवाडी फाट्याजवळ तलवारी, कुकरी जप्त एकास अटक

0
106

जत तालुक्यातील पांढरेवाडी फाट्याजवळ डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर शस्त्रसाठा पकडण्यात उमदी पोलिसांना यश आले. या कारवाईत पाच तलवारी व कुकरी, दुचाकी असा ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विजयसिंग कुपानसिंग सिंख (वय ३८, रा. वॉर्ड नंबर ५, जयनगर, मुधोळ, जि. बागलकोट) याला पोलिसांनी अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. पूर्व भागातील पांढरेवाडी

फाट्याजवळ कर्नाटकातील विजयसिंग सिंख हा बेकायदा तलवारी व कुकरीसारखी घातक शस्त्रे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस हवालदार आप्पासाहेब हाके, लक्ष्मण बंडगर, रामेश्वर पाटील, अगतराव मासाळ, गणेश नरळे, इंद्रजित घोदे, देशमुखे, तोरकड, मनीष कुंभरे, कोकाटे यांनी सापळा रचला. शनिवारी दुपारी चार वाजता संशयित लाल रंगाची काळया पांढऱ्या पट्ट्याच्या दुचाकीवरून (केए ४८, ईए १७३८) पोत्यात तलवारी,कुकरी घेऊन पांढरेवाडी फाट्यावर थांबला असल्याचा आढळून आला. पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पोत्याची झडती घेतली असता धारदार पाच तलवारी व कुकरी अशी शस्त्रे सापडली.

४.५ सेमी रूंदीची टोकाकडे निमुळती असलेली, लाल काळ्या रंगाचे कव्हर असलेल्या स्टील पात्याच्या पाच तलवारी, पात्याच्या दोन्ही बाजूस दातऱ्या असलेली कुकरी सापडल्या. पोलिस नाईक आगतराव मासाळ यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयितावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४,२५ प्रमाणे उमदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक संदीप कांबळे तपास करीत आहेत. अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी कारवाई केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here