जत : जत तालुक्यातील शेगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेगाव ते वाळेखिंडी रस्त्यावर तीस हजार रुपयांचा गांजा वाहतूक करीत असताना संशयित परशुराम गणपतराव काळे (वय ४०, रा. शेगाव) यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. मुदियाळ (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील आप्पा नामक व्यक्तीकडून काळे याने ३० हजार रुपयांचा हिरवट, काळपट रंगाचा गांजा घेतला होता. तो विक्री करण्यासाठी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेगाव गावच्या हद्दीत पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेगाव ते वाळेखिंडी जाणारे रस्त्यावर काळे (वय ४०) थांबला होता.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून काळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर ९४० ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. काळे याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सोमनाथ गुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
विळ्यासह फिरणाऱ्यास निगडी बुद्रुकमध्ये अटक
जत : जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे संशयित प्रवीण भाऊसाहेब म्हेत्रे (वय २०, रा. गिरगाव) हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून एका हातात विळा घेऊन फिरत असताना उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रवीण म्हेत्रे हा ३३ इंच लांबीचा एका बाजूस अर्धवर्तुळाकर 3 सेमी रुंदीचे असलेली पुढील बाजूस निमुळत्या आकाराचा लोखंडी विळा घेऊन दुचाकीवरून फिरत होता. उमदी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी निगडी बुद्रुकमध्ये येऊन विळा घेऊन फिरणाऱ्या प्रवीण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विळा आणि २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १०- डीएस ४७२६) जप्त केली आहे.