तासगाव :
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील हे उद्या (मंगळवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीच्या जागा वाटपात तासगाव - कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. त्यामुळे गेली दहा वर्षे भाजपमधून खासदार असणाऱ्या संजय पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय पुनर्वसन व गट टिकवण्याच्या हेतूने पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चिरंजीव प्रभाकर पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांनी स्वतः राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर संजय पाटील गट नैराश्येत गेला होता. आगामी काळात गट टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यातच विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत होता. त्यामुळे प्रभाकर पाटील यांना उमेदवारी देऊन ताकतीने ही निवडणूक लढण्याच्या दृष्टीने संजय पाटील गटाच्या हालचाली सुरू होत्या. शेवटपर्यंत प्रभाकर पाटील हेच रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार असतील, अशी चिन्हे होते.
मात्र ऐनवेळी मास्टर स्ट्रोक मारत संजय पाटील यांनी स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनी स्वतः ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातील संजय पाटील व आर. आर. पाटील यांच्या घराण्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. मध्यंतरीच्या काळात आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर हा संघर्ष थोडासा शिथिल झाला होता.
दोन्हीही गट एकमेकांशी सेटलमेंट करून राजकारण करीत होते. मात्र आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील संघर्ष उफाळून येणार आहे. संजय पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्वाची आहे. तर रोहित पाटील यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे.
तासगाव तालुक्यात दोन्हीही तुल्यबळ गट आहेत. त्यामुळे जो कोणी उमेदवार निवडून येईल तो अगदी काठावर येईल, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, संजय पाटील आपला उमेदवारी अर्ज उद्या (मंगळवार) दाखल करणार आहेत. हा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न संजय पाटील गटाचा आहे.
संजय पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांचा गट पूर्णपणे 'रिचार्ज' झाला आहे. तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीच्या निमित्ताने 'ऍक्टिव्ह' झाला आहे. गावागावातील युवकांची फळी त्यांच्या प्रचारात उतरली आहे. लोकसभेला झालेल्या चुका दुरुस्त करून या गटाची वाटचाल सुरू आहे. स्वतः संजय पाटील व त्यांचे कुटुंबीय पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अगदी 'घर टू घर' प्रचार सुरू आहे. त्यामुळे रोहित पाटील व संजय पाटील यांच्यातील सामना राज्यात लक्षवेधी ठरणार आहे, हे नक्की.