सांगली : एक वेळा मला निवडून द्या,नाहीतर मला घरात बसावं लागेल,अशा शब्दात सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातले उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. जत मतदारसंघातून भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मी अनेक वेळा निवडणुका लढवल्या आहेत. मात्र मला एकदा जनतेतून निवडून द्या, असे हात जोडून विनंती करतो. अशी भावनिक साथ भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घातली आहे. मी अनेक निवडणूक लढवल्या आहेत. 2009 ची विधानसभा निवडणूक, 2012 ची जिल्हा परिषद निवडणूक, 2014 ची विधानसभा निवडणूक, 2019 ची लोकसभा निवडणूक, 2019 ची विधानसभा निवडणूक मी लढवली. आता मी जतमधून विधानसभा निवडणुकीत उभा आहे.
मला एक चान्स द्या आणि जनतेतून निवडून द्या.नाही दिलं तर मला घरातच बसावे लागेल. माझी ही शेवटची निवडणूक आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मला एक संधी द्या. जतचे नाव महाराष्ट्रभर नाही केला तर माझं नाव बदलून टाकेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांच्या भव्य रॅलीमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पारंपारिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ही रॅली काढण्यात आली. या मतदारसंघातून भाजपामध्ये भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे पडळकर यांना पक्षातल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
जतेत महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.