माझे वडील आर. आर. पाटील यांना जाऊन आज नऊ-साडेनऊ वर्षे होत आली आहेत. मात्र इतक्या वर्षानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावात आर. आर. पाटील यांच्या विषयी विविध वक्तव्य केली. ही वक्तव्य ऐकून आमच्या कुटुंबीयांना दुःख झालं. अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मळमळ नऊ-साडेनऊ वर्षानंतर व्यक्त केली, अशी खंत रोहित पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पाटील व महायुतीचे संजय पाटील यांच्यामध्ये विधानसभेचा सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रोहित पवार यांना निमंत्रित करून रोहित पाटील यांनी तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करून संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही गटाकडून आता जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे ही लढत राज्यात लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान, आज संजय पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आर. आर. पाटील यांना मी बऱ्याच वेळा मदत केली. त्यांना आधार दिला. त्यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला. त्यांची मुलगी स्मिता हीचं लग्न मी पुढे होऊन ठरवले. पालकत्वाची भूमिका मी पार पाडली.
मात्र ज्यावेळी सिंचन घोटाळ्याच्या माझ्यावर आरोप झाला, त्यावेळी माझी उघड चौकशी करण्याची एक फाईल तयार झाली होती. त्या फाईलवर आर. आर. पाटील यांनी सही केली होती. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असा गौप्यस्फोट पवार यांनी आज केला.
अजित पवार यांनी स्व. आर. आर. पाटलांवर या सभेत विविध मुद्द्यांवरून टीका केली. अनेक वर्षे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद असतानाही मतदारसंघात विकास झाला नाही. तासगाव शहरातील रस्ते, बस स्थानक, तासगाव बाजार समितीच्या विस्तारित मार्केटचे रखडलेले काम, आर. आर. पाटील खरेदी विक्री संघाची अवस्था, किसान नागरी पतसंस्थेचा कारभार, यावरून ताशेरे ओढले. नुसती भाषणं करून पोट भरत नाही. नेतृत्वात धमक असावी लागते, अशा शब्दात त्यांनी आर. आर. पाटील कुटुंबीय व रोहित पाटील यांच्यावर आसूड ओढले.
दरम्यान, पवार यांच्या आर. आर. पाटील यांच्यावरील टीकेने आता राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर नऊ-साडेनऊ वर्षानंतर त्या व्यक्तीच्या नावाने खडे फोडले जात असल्यामुळे राजकीय टीकाटिप्पणी होत आहे. दरम्यान, याबाबत रोहित पाटील यांना एका वृत्तवाहिनीने विचारले असता ते म्हणाले, माझे वडील जाऊन नऊ-साडेनऊ वर्षे होत आले. इतक्या वर्षानंतर अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मळमळ व्यक्त करून दाखवली, याचे आमच्या कुटुंबीयांना दुःख झाले: