नावाचं काय, चष्माही सेम – सेम | रोहित पाटील यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या उमेदवारांच्या करामती : मतांच्या विभागणीसाठी विरोधकांची चाल

0
305

तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना अडचणीत आणण्याची चाल विरोधकांकडून खेळली जात आहे. रोहित पाटील यांना पडणाऱ्या मतांची विभागणी करण्यासाठी त्यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या इतर तीन उमेदवारांना विरोधकांनी अर्ज भरायला लावले आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या नावात साम्य आहेच, पण त्यांनी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे जे फोटो दिले त्यामध्ये रोहित पाटील यांच्याशी मिळते – जुळते चष्मेही घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पाटील यांच्या विरोधातील नावात साम्य असणाऱ्या उमेदवारांच्या व विरोधकांच्या करामती आता मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.

तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये रोहित पाटील व संजय पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. या लढतीच्या निमित्ताने स्व. आर. आर. पाटील व संजय पाटील गटामधील जुना राजकीय संघर्ष पुन्हा पेट घेत आहे. दोन्ही गट निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. एकमेकांना शह-काटशह देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘आता नाही तर कधीच नाही’ या इराद्याने दोन्ही गट निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, आजपर्यंत संजय पाटील यांना कधीही आर. आर. पाटील कुटुंबीयांचा पराभव करता आला नाही. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची बनली आहे. तर रोहित पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. संजय पाटील यांच्याकडून काहीही करून ही निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकताच त्यांचा लोकसभेला पराभव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जर काही उलटे – सुलटे झाले तर आगामी काळात गट टिकवणे जिकरीचे ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्याकडून सर्व ते प्रयत्न सुरू आहेत.

रोहित पाटील यांना अडवण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्यांना पडणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी विरोधकांनी रोहित पाटील यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या इतर तीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला लावले आहेत. त्यामध्ये रोहित राजगोंडा पाटील (रा. नेहरूनगर), रोहित राजेंद्र पाटील (रा. निमणी), रोहित रावसाहेब पाटील (रा. चिंचणी) अशी अर्ज भरलेल्या तिघांची नावे आहेत. नावातील साम्यामुळे मतांची विभागणी होईल व त्याचा फटका रोहित पाटील यांना बसेल, असे गणित विरोधकांकडून मांडले जात आहे.

दरम्यान, रोहित पाटील यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या तीनही उमेदवारांच्या करामती आता मतदारसंघांमध्ये चर्चिल्या जात आहेत. या उमेदवारांनी रोहित पाटील यांच्याशी मिळते जुळते चष्मेही खरेदी केले. हे चष्मे घालून फोटो काढले. हेच फोटो निवडणूक आयोगाला अर्ज भरताना दिले. हे फोटो आता मतदान यंत्रावर येणार असल्याने मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून रोहित आर. आर. पाटील यांना पडणाऱ्या मतांमध्ये विभागणी होण्याचे संकेत आहेत.

आमचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ : रोहित पाटील समर्थकांचे स्पष्टीकरण

       

विरोधकांनी रोहित पाटील यांना अडवण्याचे अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अशा प्रकारे कमरेखालचे वार केले जात आहेत. मात्र आमच्या गटाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह मतदारसंघासह राज्यभर रुजले आहे. त्यामुळे मतदारांनी केवळ ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह पाहून मतदान करावे. विरोधकांच्या कपटाला बळी पडू नये, असे आवाहन रोहित आर. आर. पाटील समर्थकांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here