मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या निवडणूक रिंगणात विविध पक्षांचे सहा उमेदवार व आठ अपक्ष, असे एकूण १४ उमेदवार राहिले आहेत. येथे भाजप व शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य लढत दिसणार आहे. या मतदारसंघात अर्ज छाननीनंतर २७ उमेदवार रिंगणात होते.
सोमवारी अर्ज मागे घ्यायची अंतिम मुदत होती. या दिवशी एकूण १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामध्ये काँग्रेसचे मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे या प्रमुख उमेदवारांसह १३ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणामध्ये १४ उमेदवार उरले आहेत.
यामध्ये भाजपप्रणित महायुतीचे उमेदवार व पालकमंत्री सुरेश खाडे, महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेनेचे नेते तानाजी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने, बहुजन समाज पार्टीचे आकाश व्हटकर, जनहित लोकशाही पार्टीचे प्रशांत सदामते, अपक्ष अमित कांबळे, दीपक सातपुते, जैनब पिरजादे, मकरंद कांबळे, सचिन वाघमारे, सदाशिव कांबळे, संतोष पोखरणीकर, स्टेला गायकवाड यांचा समावेश आहे.
अपक्ष उमेदवारांना सोमवारी चिन्हांचेही वाटप करण्यात आले. मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, जनहित लोकशाही पार्टी, एमआयएम या पक्षांचे उमेदवार उभे असले तरी, प्रमुख लढत ही भाजप- महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांच्यात होणार, हे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी मागे घेण्याबाबत उत्कंठा…
उमेदवारी कोण मागे घेतो आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात राहतो, हे सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार होते. मात्र सकाळपासूनच याबाबत मतदारसंघांमध्ये व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती. विविध पक्षांचे नेते व कार्यकर्तेही एकमेकांना फोन करून याबाबतची माहिती घेत होते. काही उमेदवारांना त्यांचे कार्यकर्ते माघार न घेण्याबाबत विनंती करत होते.